पुणे- झाडाची फांदी डोक्यात पडून 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील आपटे रस्त्यावर दुपारी बाराच्या सुमारास घडली. जयश्री जगताप असे मृत महिलेचे नाव आहे. त्या चहा पिण्यासाठी त्या एका चहाच्या दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी त्या ठिकाणच्या एका झाडाची कुजलेली फांदी त्यांच्या डोक्यात कोसळली. इतर सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जगताप या दिव्यांग होत्या.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, घोले रस्त्यावरील नेहरु हॉलमध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत पुणे महापालिकेने बैठक बालावली होती. या बैठकीला विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी प्रहार क्रांती अपंग संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या जयश्री जगताप या इतर सहकाऱ्यांसोबत चहा पिण्यासाठी संतोष बेकरी जवळील एका चहाच्या दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, जी फांदी आज जयश्री जगताप यांच्या डोक्यात पडली, ती फांदी सुरक्षेच्या कारणावरून अर्धी कापण्यात आली होती. उरलेली फांदी कुजून पावसाच्या पाण्याच्या ओझ्यामुळे कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.