पुणे : पुणे शहरात ( City of Pune ) जरी पावसाच्या हलक्या सरी पडत असल्या तरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत ( Khadakwasla dam chain ) अडीच टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. मात्र, हा निर्णय आठ दिवसांसाठी म्हणजेच 11 जुलैपर्यंतच असणार ( Decision to supply water during the day ) आहे. हवामान विभागाकडून 7 ते 15 जुलैपर्यंत चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने महापालिकेकडून आठवडाभरानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
खडकवासला पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी : पावसाळा सुरू होऊन एक महिना होत असला तरी अद्यापि खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला जोर नाही. या पावसाळी वर्षात जून महिन्यादरम्यान खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 17 मिलिमीटर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 82 मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 78 मिलिमीटर, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 63 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत प्रामुख्याने पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे ( Panshet, Temghar, Varasgaon Dam ) येतात. या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असेल तरच खडकवासला धरणामध्ये विसर्ग केला जातो. परंतु, या धरणसाखळीच्या क्षेत्रांत पावसाचा जोर नसल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. डोंगरदऱ्यांमधून येणारा पाण्याचा स्रोत पावसाअभावी कमी झाला आहे. तसेच या धरणांचे नैसर्गिक स्त्रोतदेखील औद्योगिकीकरणामुळे कमी झाले आहेत. कारण पुण्याच्या जवळ असणाऱ्या या परिसरांत आता औद्योगिकीकरण वाढले आहे. उदा. टेमघर धरणाच्याबाजूला असलेला लवासा प्रकल्प. एकंदरीत या सर्व गोष्टींचा परिणाम पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवर होतो. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कमतरता येते. अंतत: खडकवासला धरणातदेखील पाण्याचा विसर्ग करता येत नाही.
धरणांमध्ये पाणीसाठा कमी : यंदाचे वर्षी पाऊस खूप लांबल्याने, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमधील पाणीसाठा अत्यंत कमी झालेला आहे. सद्य:स्थितीत असणारा पाणीपुरवठा तसाच सुरू ठेवल्यास व पाऊस लांबल्यास पुणे शहरास मिळणाऱ्या पाणीपुरवठ्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास व पर्यायाने धरणांमधील पाणीसाठा योग्य प्रमाणात न वाढल्यास, पुणे शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होऊ नये यासाठी पुणे महानरपालिकेने पुणे शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केलेले आहे.
दिवसाआड पाण्याचे नियोजन फक्त 11 जुलैपर्यंत : हे नियोजन सोमवार दिनांक 04 जुलैपासून करण्यात येऊन, सुरुवातीला ०८ दिवसांसाठी म्हणजेच दिनांक 11 जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. यादरम्यान पडणारा पाऊस व धरणांमधील पाणीसाठा याचा विचार करून, पाणी वितरण व्यवस्थेसंदर्भात पुढील नियोजन करण्यात येणार आहे. सोबत एक दिवसाआड करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे, असे पत्र पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने काढले आहे.
हेही वाचा : Ujani Dam Water Storage : उजनी धरणात यंदा 65 टक्के पाणीसाठा शिल्लक; पहा पुणे जिल्ह्यातील अन्य धरणांची स्थिती