पुणे- मौजे वाघोली हे गाव पुणे महानगर पालिकेच्या शेजारील अतिशय वेगाने नागरीकरण होणारे गाव आहे. वाघोली येथील ग्रामपंचायतीकडून बहुतांश गृहप्रकल्पांना पिण्याचे पाणी मिळत नाही. यामुळे येथील नागरिकांना 12 महिने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सन 2018 मध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडून वाघोलीसाठी वाढीव नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.मात्र,आत्तापर्यंत वाघोली येथे या योजनेचे कोणतेही काम सुरु झालेले नाही. याविरोधात या ठिकाणाच्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयावर मोर्चा काढला.
वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची तरतूद करण्यापासून ते पाण्याचा उद्भव,जॅकवेल, मुख्य वितरण नलिका,पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक जागा, नकाशे तयार करणे अशा अनेक कामांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही कोणतेही काम सुरु करण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता अत्यावश्यक बाब म्हणून ही योजना मंजूर करण्यात आली होती.मात्र, प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही, असे आंदोलकांनी सांगितले.
वाढीव नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाईसाठी दोषी असलेल्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलन करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे.