पुणे- राजकीय,सांस्कृतिक तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पुण्यातील वाडेश्वर कट्टा प्रसिद्ध आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काही बंद असताना वाडेश्वर कट्ट्यावर रंगणारी चर्चाही बंद होती. तब्बल 7 महिन्यानंतर पुन्हा एकदा आज वाडेश्वर कट्ट्यावरील चर्चेचे 'पुनःश्च हरिओम' करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात कोरोना योद्धा म्हणून पुण्यात काम केलेल्या पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आयएमआयचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांच्या हस्ते या वाडेश्वर कट्ट्याचे पुनःश्च हरिओम करण्यात आले आहे. पुण्यातील कोरोना आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा या कट्ट्यावर यावेळी करण्यात आली. यावेळी इडली वडाचा आस्वादही उपस्थित मान्यवरांनी घेतला. या कट्ट्यावर कोणताही राजकीय संबंध न जोडता मोकळ्या मनाने चर्चा करता येतात. विशेष म्हणजे बदलत्या पुणे शहराबाबत चर्चा करता येते.
महापौर, आयुक्त आणि आयएमआय यांच्या उपस्थितीत पुण्यात पुढे काय करायचे आहे काय नाही, अशी चर्चा करण्यात आली. कोरोनानंतर पुण्यातील परिस्थिती बदलली आहे. पण अजूनही कोरोना संपला नाही. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुण्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. आम्ही जर आमची काळजी घेतली तर दुसरी लाट येऊ शकत नाही. जरी दुसरी लाट आली तरी महापालिका यासाठी सज्ज असल्याची माहिती यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापौर मोहोळ म्हणाले, की कोरोना नियंत्रणात येत असताना जनजीवनही सुरळीत होणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत पुण्याची सांस्कृतिक ओळख पूर्वपदावर हळूहळू येत आहे. या कट्टयाद्वारे सर्व सुरळित सुरू होण्याचा संदेश गेला आहे. तरी कोरोना संपला नाही. आपल्याला काळजी घेऊनच सर्व काम करायचे आहे. कोरोनाला सोबत घेऊनच त्याला संपवायचे आहे. हाच आता आपल्याकडे शेवटचा पर्याय असल्याचे मत यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.