पुणे - जिल्ह्यातील बारामती तालुक्यात असणारे डोर्लेवाडी हे गाव. या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे हत्यार उचलले आहे. गावात मूलभूत सोयी सुविधा मिळत नाहीत. तसेच स्थानिक पातळीवरील पदाधिकारी अपमानास्पद वागणूक देतात, अशा समस्या मांडत या गावकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा... 'पुन्हा आणूया आपले सरकार'.. भाजपचा टी शर्ट घालून बुलडाण्यात शेतकऱ्याची आत्महत्या
डोर्लेवाडी येथे मुस्लीम, लिंगायत, लोहार, सुतार, जैन, कोष्टी, वडार अशा अल्पसंख्याक समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या गावाने आजपर्यंत प्रत्येक मतदानात नेहमीच उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. मात्र अलिकच्या काळात गावपातळीवरील पदाधिकारी, तसेच प्रशासनातील अधिकारी आपल्या समस्यांकडे लक्ष देत नाही, आपल्याला योग्य वागणूक देत नाहीत. तसेच नागरिकांसाठी आवश्यक त्या मुलभूत सुविधाही आपल्याला मिळत नाही, असे या ग्रामस्थांचे म्हणने आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आपल्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ग्रामस्थांनी अखेर आता बहिष्काराचे हत्यार उगारले आहे.
हेही वाचा... 'मोदीच काय ट्रम्प जरी परळीत आणला तरी माझा विजय कोणी रोखू शकत नाही'
काय आहेत डोर्लेवाडी गावातील समस्या ?
डोर्लेवाडी येथील मुस्लीम समाजाच्या दफनभूमी व मस्जीद परिसरातील सुशोभीकरणाचा अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. लिंगायत समाजाच्या दफनभूमीची १०० वर्षांपूर्वीची वहिवाट असूनही याठिकाणी जाण्यास रस्ता नाही. दफनभूमीचा संपूर्ण परिसर काटेरी झुडपांनी वेढलेला आहे. गावातील जैन, कोष्टी, सुतार, लोहार समाजालाही मुलभूत विकासापासून वंचित ठेवल्याचे येथील ग्रामस्थांचे मत आहे. यामुळे गावात नाराजीचे एक वातावरण तयार झाले आहे.