पुणे - शहराला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाचा तडाखा बसला. ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शहराच्या अनेक भागात झाडे उन्मळून पडली. शिवाजीनगर येथील मुख्य रस्त्यावर दिशादर्शक फलक तर मंगळवार पेठेत मोबाईल टॉवर कोसळला. लॉकडाऊन असल्यामुळे पुणेकर घरातच बसून आहेत, त्यामुळे कुठलीही दुर्घटना घडली नाही.
पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तवला होता. आज दुपारपासूनच शहरात उकाडा जाणवत होता. दुपारी चारच्या सुमारास शहराच्या विविध भागात ढगाळ वातावरण तयार झाले होते. काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचले होते.
ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह तासभर कोसळल्या पावसामुळे पुण्यातील अनेक भागात झाडे तर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या होत्या. याशिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे दिशादर्शक फलकही उन्मळून खाली पडले होते. अग्निशमन दल आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम सुरू केले आहे.