पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याच्या महसुलात मोठी घट झाल्याने दारू दुकाने सुरू करावी, असे सरकारला सुचवले त्यावर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तृप्ती देसाई यांनी आपली मते मांडताना म्हटलंय की, राज्यात महसूल निर्माण करता येईल आणि राज्याचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर आणता येईल परंतु महिलांचे शाप मिळणारा महसूल"वाईन शॉप"मधून सरकारला मिळतो. एक महिना उलटून गेला महाराष्ट्रात दारूची दुकाने बंद आहेत म्हणजे राज्यातील जनता व्यसनमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. परंतु अचानक वाईन शॉप सुरू केले तर घरी जे काही साठवलेले, उरलेले पैसे आहेत ते दारूवर खर्च केले जातील.
गुन्हेगारी वाढेल आणि गरीब घरातील माणसं धान्य विकून दारू घ्यायला जातील. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यामुळे राज्याचा महसूल वाढला पाहिजे, हे बरोबर आहे. तो पण दारूतून नको. अनेक महिलांचा संसार उद्ध्वस्त या दारुमुळेच झाला आहे. सरकारने दारूची दुकाने सुरू करू नये एवढीच सर्वसामान्यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमची विनंती राहील, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.