पुणे - चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामाने वेग घेतला आहे. मात्र, येथे आता वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणातवर होत आहे. पुण्यात कोथरूडमार्गे प्रवेश करणारे वाहन चालक जसे त्रस्त झाले आहेत. तसेच, महामार्गांवरून सातारा व सोलापूरकडे जाणारे वाहनचालकही कोंडी, अपघात व खराब रस्त्यामुळे गाड्या नादुरुस्त होणे, ह्याला त्रासले आहेत. या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी या मार्गाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे मत ऐकून घेऊन त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याच्या सुचना चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या आहेत. येत्या 8 दिवसांत युद्धपातळीवर कोंडी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
प्रमुख उपाययोजना-
1) सर्व खड्डे तातडीने बुजविणे व विशेष सॉल्युशनचा वापर करून सदर काम करणे. 2) चांदणी चौकातून पुण्यात (कोथरूड मार्गे) प्रवेश करतानाच्या मार्गांवरील पत्रे तसेच मुळशी वरून चांदणी चौकात येताना रस्त्यावर असलेले पत्रे थोडे मागे सरकावून अतिरिक्त लेन तयार करणे, जेणेकरून वाहतूक सुकर होईल. 3) सर्व्हीस रस्ते डागडुजी करून त्वरित सुरु करणे. 4) 25 ट्रॅफिक वार्डन ची त्वरित नियुक्ती करणे. 5) दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास कायमस्वरूपी टोईंग व्हॅनची व्यवस्था करणे. 6) रस्त्यावरील पसरलेली खडी उचलणे. 7) पुणे मनपा सोबत समन्वय साधून जागा ताबा हा विषय त्वरित मार्गी लावणे व त्यायोगे सर्व्हिसरस्ते व अन्य मार्ग प्रशस्त करणे. यासह विविध छोटे-मोठे विषय त्वरित पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पुढील आठवड्यात या विषयीचा पाठपुरावा करण्यात येईल असही चंद्रकांतदादा यावेळी म्हणाले आहेत.
संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित
यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक दिलीप वेडेपाटील, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, वाहतूक पोलीस निरीक्षक बापू शिंदे, मनपाचे प्रकल्प चे श्री. रणदिवे, भुसंपादन चे श्री. राजेंद्र थोरात, क्षेत्रीय अधिकारी सचिन तामखेडे, पथ विभागाचे श्री. शिर्के, स्वप्नील खोत एन सी सी चे धंनजय वडेर, प्रत्यक्ष काम करणाऱ्या कंत्राटदारांचे प्रतिनिधी, भाजपचे कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, पदाधिकारी गणेश वर्पे, दुष्यन्त मोहोळ व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.