पुणे: पुण्याच्या चांदणी चौकातील (chandani chowk pune) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी आणि नवीन पुलाच्या (chandani chowk bridge) कामासाठी खडक फोडण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत दररोज मध्यरात्री साडेबारा ते एक दरम्यान चांदणी चौक येथील सर्व बाजूची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासना कडून घेण्यात आला आहे.
वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईहून साताऱ्याला जात असताना चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यानंतर येथील जुना पूल पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. तब्बल महिनाभराच्या तयारीनंतर 600 किलो स्फोटके वापरून हा पूल पाडण्यात आला. हा जुना पूल पडल्यानंतर पुणेकरांना आता वाहतूक कोंडी तून थोडाफार दिलासा मिळाला आहे. सद्यस्थितीत जुना पुलाच्या ठिकाणी साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या तीन लेन व मुंबईकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या चार लेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. त्यामुळे चांदणी चौक भागातील वाहतूक कोंडीची समस्या काही अंशी कमी झाली आहे.
लेन मधील खडक फोडण्याचे काम सुरु: दरम्यान, चांदणी चौकातला पूल पाडला तरी दर दोन दिवसांनी लेन मधील खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येत होतं. त्यासाठी वाहतूक देखील थांबवण्यात येत होती. या कारणामुळे प्रवाशांना एक ते दीड तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असे. चांदणी चौकातील पूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका मिळेल अशी आशा पुणेकरांना होती, मात्र लेन मधील खडक फोडण्याच्या कारणाने दर दोन दिवसांनी वाहन चालकांना मनस्तापाचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता प्रशासनाने दररोज रात्री अर्धा तास या कामासाठी राखीव ठेवला असून त्या काळात वाहतूक थांबवण्यात येणार आहे.