पुणे - लेह येथे पूल उभारण्याच्या कामादरम्यान दरीत कोसळून वीरमरण आलेले लष्कराच्या 115 इंजिनिअर्सच्या तुकडीतील नाईक सचिन मोरे यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. 26 जून) सायंकाळी पुणे विमानतळावर खासगी विमानाने आणण्यात आले. यावेळी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आणि हवाई दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यांचे पार्थिव पुण्यातून लष्करी वाहनाने मालेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळगावी येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकादरम्यान झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले होते. या घटनेनंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण असताना भारताने सीमावर्ती भागात रस्ते बांधणीच्या कामाला सुरुवात केली आहे. याच कामादरम्यान पुलाची बांधणी करताना खोल दरीत कोसळल्याने सचिन मोरे शहीद झाले.
हुतात्मा सचिन मोरे हे एसपी- 115 इंजिनिअर्सच्या तुकडीत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे 17 वर्षे अभियांत्रिकी विभागात ते कार्यरत होते. सचिन मोरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, सहा महिन्यांचा मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच साकुरी गावावर शोककळा पसरली आहे.
सचिन मोरे हे मूळचे नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील रहिवाशी होते. त्यांचे पार्थिव एका खासगी विमानाने शुक्रवारी (दि. 26 जून) पुण्यात आणण्यात आले. विमानतळावर त्यांना दक्षिण मुख्यालयाचे आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मानवंदना देण्यात आली. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या सुपुत्राला गलवान येथे वीरमरण; साकुरी झाप गावावर शोककळा