पुणे - बालगंधर्व' हे नाव रंगभूमीप्रेमी तसेच नाट्य रसिकाच्या मनातले सोनेरी पानं. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रवेश करतानाच तुम्हाला दोन फोटो दिसतील. एका फोटोमध्ये रुबाबदार फेटा, कुर्ता आणि पायजमा घातलेला तरुण तर दुसऱ्या फोटोमध्ये नऊवारी साडी नेसलेली आणि दागिने घातलेली एक सुंदर स्त्री. बालगंधर्व यांचं काम पाहण्याचं भाग्य न लाभलेल्यांना व्यक्ती आणि आजच्या तरुण पिढीला बालगंधर्व यांचे दोन फोटो बरंच काही सांगून जातात. या फोटोंमधील भाव पाहून आजही नाट्यरसिक थक्क होतात. ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावर अभिनय सादर करण्यास समाज मान्यता नव्हती त्याच काळात स्त्री भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा आज स्मृतीदिन. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा जीवनप्रवास-
भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली - नारायण श्रीपाद राजहंस यांचा जन्म 26 जून 1888 रोजी झाला. 1905 साली किर्लोस्कर नाटक मंडलीच्या शाकुंतल नाटकातून त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यांनी या नाटकामध्ये शकुंतलेची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. तेव्हापासूनच त्यांना नाटकामध्ये स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही भूमिका साकारण्यास सुरुवात केली.
नाट्यरसिकांच्या मनात विशेष स्थान - 1911 साली कृष्णाजी खाडिलकरांच्या मानापमान या नाटकामध्ये बालगंधर्व यांनी साकारलेल्या भामिनी या भूमिकेनं नाट्यरसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. आपल्या सुमधुर आवाजाने आणि अभिनयाची मनं जिंकत होते. वद जाऊ कुणाला शरण, मला मदन भासे, नाथ हा माझा या बालगंधर्व यांनी गायलेली पदे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होती.
लोकमान्य टिळकांनी बहाल केली 'बालगंधर्व' पदवी - बालगंधर्व हे भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. त्यांचे नाट्यसंगीत ऐकून आणि अभिनय पाहून अनेक दिग्गज यांच्या पाठिवर शाब्बासकीची थाप देत होते. आचार्य अत्रे एकदा म्हणाले होते. 'पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल. 'नारायण श्रीपाद राजहंस यांचा अभिनय पाहिल्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना 'बालगंधर्व' पदवी बहाल केली. त्यानंतर त्यांना यांच्या नावाने संबोधले जाऊ लागले.
कर्ज,आर्थिक चढ उताराची परवा न करता केली रंगभूमीची सेवा - 1913 मध्ये बालगंधर्व यांनी गणेश गोविंद बोडस आणि गोविंदराव टेंबे यांच्यासह किर्लोस्कर नाटक संस्था सोडली. त्यानंतर त्यांनी गंधर्व संगीत मंडळीची स्थापना केली. 1921 मध्ये कर्जात अडकलेल्या या नव्या कंपनीचे बालगंधर्व हे एकमेव मालक होते. त्यानंतर त्यांच्या नाटकांनी मिळवलेल्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यापुढच्या सात वर्षांत कंपनीने सर्व देणी फेडली. बालगंधर्व यांनी त्यांच्या जीवनात आर्थिक चढ-उतारा आणि डोक्यावर असणारे कर्ज या सर्व गोष्टींचा समना केला पण रंगभूमीची सेवा करत होते. नाटकामध्ये वापरण्यात येणारी प्रॉपर्टी तसेच नाटकातील भूमिकेचे दागिने या सर्व गोष्टींचा अस्सलपणा राखण्याचा बालगंधर्वांचा आग्रह होता.
पुरस्कारांचा वर्षाव - बालगंधर्व यांचा 1955 साली संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. भारत सरकारने बालगंधर्वाना इ.स. 1964 साली पद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले. विष्णूदास भावे पुरस्कार देखील बालगंधर्व यांना हा पुरस्कार मिळाला होता. 15 जुलै 1967 रोजी बालगंधर्व यांचे निधन झाले. आजही नाट्यप्रेमींच्या मनातील स्थान हे अढळ आहे.
हेही वाचा - मुख्यमंत्री शिंदेंकडून नरेश मस्के यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी पुनश्च नियुक्ती; म्हणाले, 'हकालपट्टी हे