पुणे - न्यायालय परिसरातून 1 ऑक्टोबरला ॲड. उमेश मोरे (वय 33) रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते. दोन दिवस शोध घेतल्यानंतरही ते सापडले नसल्यामुळे कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आलीय. उमेश मोरे यांचा खून करण्यात आला असून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह पेट्रोल ओतून जाळण्यात आला.
पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली. कपिल विलास फलके (वय 34), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28) आणि रोहित दत्तात्रय शेंडे (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दृश्यम चित्रपटाच्या कथेनुसार हा खून झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
1 ऑक्टोबरला उमेश मोरे यांचे शिवाजीनगर न्यायालय परिसरातून आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी हा मृतदेह ताम्हीणी घाटात नेऊन पेट्रोल ओतून जाळला. दरम्यान अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना घटनेच्या दिवशी काही व्यक्ती संशयास्पदरीत्या हालचाल करताना दिसल्या होत्या. त्यांना डोळ्यासमोर ठेवून पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आणि नंतर उर्वरित दोघा आरोपींना अटक केली. या तीनही आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे. यातील आरोपी रोहित शेंडे हा वकील आहे. त्याच्यावर यापूर्वी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.
सूत्रधार वेगळाच
या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड वेगळाच असल्याचा पोलिसांचा संशय आहे. आरोपींनी त्याच्या सांगण्यावरून उमेश मोरे यांचे अपहरण करून नंतर त्यांचा खून केला आहे. त्यामुळे या सूत्रधारांना शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.