बारामती - महाराष्ट्र राज्यातील काही भागात १८ ते २३ मार्च दरम्यान पाऊस पडेल अशी शक्यता नुकतीच हवामान खात्याने वर्तवली होती. हवामान खात्याचा हा अंदाज प्रत्यक्षात आला असून आज बारामती तालुक्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गारपीटीमुळे शेतकऱ्यांची काढणीला आलेली पिके संकटात सापडली आहेत.
या गावातील पिकांना बसला फटका -
सायंकाळी पाचच्या सुमारास ढग दाटून येत बारामती तालुक्यातील काही भागात पावसाने तडाखा दिला तर काही भागात गारपीट झाली. या पावसाचा तालुक्यातील मोरगाव, उंडवडी, सोनवडी सुपे, जराडवाडी, कारखेल, तरडोली, आंबी खुर्द, जोगवडी, माळवाडी, आंबी बुद्रुक या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. या भागातील शेतकऱ्यांचे काढणीला आलेली पीके या अस्मानी संकटामुळे अडचणीत सापडली आहेत. गहू, हरभरा, मका,ज्वारी आदी काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
शेतकऱ्यांवर पुन्हा ओढवले संकट -
गतवर्षी कोरोनासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या अडचणीतून शेतकरी सावरत असतानाच आज अचानक गारपिटीसह जोरदार पावसाने दिलेल्या तडाख्यामुळे गहू, हरभरा, मका,ज्वारीसह आदी पिके संकटात सापडली आहेत. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.