पुणे - शहरातील औंध परिसरातील नऊ दुकाने चोरट्यांनी एका रात्रीतून फोडली असून हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. पुण्यातील औंध-बाणेर रस्त्यावरील परिहार चौकात रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी यातील एका किराणा मालाच्या दुकानात असलेले २७ हजार ५०० रुपयांची रोकड आणि इतर माल, असा ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रमेश चौधरी (३४) यांनी याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा... यवतमाळातील 'मांझी'ने २ वर्षं मेहनत करून खोदली ३० फूट खोल विहिर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फिर्यादीच्या दुकानाचा दरवाजा उचकटत दुकानातील गल्ल्यात असलेली रोख रक्कम आणि इतर माल चोरून नेला. त्यानंतर याच परिसरातील गो कलर्स, सनशाईन होजिअरी, एलेन सोली, शूज एक्सप्रेस, पूनम कलेक्शन, एशियन पेंट्स, बास्किन रॉबिन्स, गोकुळ स्वीटस या दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी त्या दुकानांमधील काही माल चोरुन नेला.
दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर या सर्व व्यापाऱ्यांनी चतुःशृंगी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुकानांच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यात दोन चोरटे फिरताना दिसत आहेत. चोरट्यांनी रेनकोट, टोपी, हातमोजे तसेच चेहरा झाकून घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव करत आहेत.