पुणे - पुण्यातील नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या नॅशनल हॉर्स रायडर तरुणीने रविवारी सकाळी अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिने आत्महत्या का केली याचे कारण त्यावेळी समोर आले नव्हते. ते आता स्पष्ट झाले आहे. या मुलीने ऑनलाईन अभ्यासाच्या तणावातून हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याची माहिती तीच्या कुटुंबियांनी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (श्रिया गुणेश पुरंदरे वय, 17) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे.
'श्रिया ही नॅशनल हॉर्स रायडर होती'
श्रिया ही नॅशनल हॉर्स रायडर होती. तिच्या वडिलांची स्वतःची हॉर्स रायडिंग अकॅडमी होती. लहानपणापासून ती वडिलांच्या या अकॅडमीत हॉर्स रायडिंगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पारितोषिके पटकावली होती. ती सध्या बारावीत शिकत होती. हवेली पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
'ऑनलाइन अभ्यासाच्या मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचा कुटुंबीयांचा दावा'
श्रियाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवला. तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ऑनलाइन अभ्यासामुळे ती मानसिक तणावात होती. याच तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचे, त्यांनी सांगितले. श्रियाला दहावीत तब्बल 95 टक्के गुण मिळाले होते. सध्या ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नांदेड सिटीतील मधुवंती इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून तिने खाली उडी मारली. सोसायटीतील नागरिकांनी तातडीने तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत्यू झाल्याचे, घोषीत केले. या घटनेप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.