पुणे - पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मागील दोन महिन्यांपासून पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच होती. मात्र गेल्या 6 दिवसांच्या कोरोना आकडेवारीवर नजर टाकल्यास, नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढली असल्याचे समोर येत आहे.
शहरात मार्च महिन्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली, त्यानंतर पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णाची संख्या चार हजार, पाच हजारपासून वाढत सहा हजारांच्या घरात गेली, आणि एप्रिलच्या मध्याला कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला, शहरात दररोज तब्बल 7 ते 10 हजारांच्या दरम्यान रुग्णांची नोंद होऊ लागली. वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक निर्बंध आणि इतर उपाय करण्यात आले, आता हळूहळू या निर्बंधांचा फायदा होत असून, पुण्यात कोरोनामुक्तांची संख्या वाढत आहे. हे गेल्या सहा दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आढळून येईल.
गेल्या सहा दिवसांची कोरोना आकडेवारी
२० एप्रिलला दिवसभरात ५१३८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली होती तर दिवसभरात ६८०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता, पुढच्या दिवशी २१ एप्रिलला दिवसभरात ५५२९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ तर दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६५३० होता. २२ एप्रिलला दिवसभरात ४५३९ रुग्णांची नोंद झाली तर ४८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. २३ एप्रिलला ४४६५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले तर, ५६३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. २४ एप्रिलला ३९९१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, ४७८९ रुग्णांना डिस्चार्ज. २५ एप्रिलला ४६३१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, ४७५९ रुग्णांना डिस्चार्ज. तर २६ एप्रिलला सोमवारी दिवसभरात २५३८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून ४३५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. थोडक्यात एकूण आकडेवारीवर नजर टाकल्यास पुण्यामध्ये हळूहळू कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
दिलासादायक - व्हाट्सअॅप ग्रुपमधील प्रत्येक पोस्टसाठी अॅडमिन जबाबदार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय