पुणे - मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याच आज शेवटचा दिवस. महिनाभर मुस्लिम धर्मियांच्या वतीने रोझा (उपवास) ठेवण्यात आला. दोन वर्षांनंतर पुण्यातील मोमीनपुरा येथे रमजाननिमित्ताने गर्दी पाहायला मिळाली. ईद आणि रमजान निमित्ताने मोमीनपुरा येथे विविध खाद्यपदार्थ तसेच ईदच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली.
दोन वर्षांनंतर सजली बाजारपेठ - कोरोनाच्या पश्वभूमीवर गेली दोन वर्षे निर्बंधांत काढावी लागली. या 2 वर्षांत सर्वच सण उत्सव हे शासनाच्या नियमानुसार साजरी करावी लागली. पण, यंदा निर्बंध हटवल्याने गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे यंदाचे रमजान हे निर्बंधमुक्त साजरा करण्यात आले. पुण्यातील मध्यभागी असलेल्या मोमीनपुरा येथे रमजानच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणत विविध खाद्यपदार्थाची दुकाने लागली आणि नागरिकांनीही गर्दी मोठ्या प्रमाणात केली होती. चिकन, चिकन तंदुरी, कबाब, बिर्याणी, तहूरा, दालचा अशा विविध खाद्यपदार्थची दुकाने यंदा मोठ्या प्रमाणात लागली होती.
यंदा सर्वच खाद्यपदार्थ झाले महाग - रमजानच्या निमित्ताने जरी शहरात तसेच विशेषतः मोमीनपुरा येथे दुकाने सजली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून वाढत असलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीचा परिणाम यंदाच्या रमजानमध्ये पाहायला मिळाले.जे चिकन तंदुरी 150 ते 200 रुपयात मिळत होती. ती यंदा 300 ते 350 मिळत आहे. सर्वच खाद्यपदार्थामध्ये यंदा वाढ झालेली पाहायला मिळाली. पण, यंदा जरी किंमतीत वाढ झाली असली तरी नागरिकांची गर्दी ही दिवसंदिवस वाढतच होती.
150 ते 200 दुकाने लागतात - रमजानच्या निमित्ताने पुण्यातील मोमीनपुरा येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थचे दुकाने लागत असतात. मागील 2 वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध होते. पण, यंदा निर्बंध नसल्याने 150 ते 200 दुकाने त्यात खाद्यपदार्थ, सरबत, कपडे, चहा तसेच ईदच्या खरेदीच्या दुकानांनी मोमीनपुरा सजली होती.
सर्वच धर्मीय येतात मोमीनपुरा येथे - पुण्यातील मध्यभागी असलेल्या मोमीनपुरा येथे रमजानच्यानिमित्ताने सर्वच धर्मीय विविध खाद्यपदार्थ खायला येत असतात. विशेष म्हणजे रमजानच्या महिन्यात या परिसरात सर्व धर्मीयांसाठी रोजा इफ्तारचा कार्यक्रमही आयोजित केला जातो आणि सामाजिक संदेशही दिला जातो.
हेही वाचा - Nagraj Manjule : 'दिग्दर्शक वादग्रस्त चित्रपटांची निर्मिती करून समाजात वाद निर्माण करतात'