पुणे - राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या सफाई कामगारांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. या कामगाराने विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयातील चार यूपीएस चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनंत विश्वनाथ मोरे (वय ३४, रा. विधाते वस्ती, बाणेर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची नाव आहे. याप्रकरणी सीआयडीचे पोलिस हवालदार विजय साहेबराव सुळ (वय ४६) यांनी तक्रार दिली आहे. संबंधित कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील पाषाण रस्त्यावर सीआयडीचे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये तक्रारदार विजय सुळ हे मागील चार वर्षांपासून हवालदार म्हणून काम करतात. 8 मार्चला सकाळी पोलिस उपअधीक्षक अनुजा देशमाने यांनी सीआयडीच्या नियंत्रण कक्षाला फोन करून विशेष पोलिस महानिरीक्षक गुन्हे पश्चिम यांच्या कार्यालयातील युपीएस चोरीला गेल्याचे कळविले होते. त्यानंतर चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू असताना सहा ते आठ मार्च दरम्यान चार युपीएस चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी सीआयडीच्या नियंत्रण कक्षातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता तेथे सफाई कामगार म्हणून काम करणारा अनंत मोरे यानेच चार युपीएस चोरून नेल्याचे आढळून आले. त्यापैकी एक युपीएस त्याने पार्कींगमधील बाथरूमध्ये लपविला असल्याचे आढळून आले. त्यानुसार याप्रकरणी बीएम माळी हे अधिक तपास करत आहेत.