पुणे - कर्वे रस्त्याकडून म्हात्रे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर 'स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्ग' आहे. या मार्गाचा वापर स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्याच्या नूतनीकरणाचे काम झाले असून आता सुधीर फडके भुयारीमार्ग देखण्यारूपात झाला असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून या भुयारीमार्गात थांबून फोटो काढले जात आहेत.
१६ वर्षांपूर्वी स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्गाचे झाले होते उदघाटन
नगरसेविका तसेच महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष माधुरी सहस्रबुद्धे यांच्या विकासनिधीतून हे काम करण्यात आले आहे . "१६ वर्षांपूर्वी स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्गाचे उदघाटन झाले होते. मात्र आता बराच कालावधी लोटल्याने या भुयारी मार्गातील विद्युत व्यवस्था अतिशय अपुरी वाटत होती. म्युरल्सची दुरावस्था झाली होती. त्यामुळे याचे संपूर्ण नूतनीकरण करून म्युरल्सचे सुबक पेंटींग करून घेतले आहे . त्यात स्पॉट लाईट बसवून त्याची शोभा वाढवली आहे . म्युरल्सना भक्कम लोखंडी चौकटी करून टफन्ड काचा बसविल्याने चांगली पारदर्शकता प्राप्त झाली. आता पादचाऱ्यांसाठी हा भुयारी मार्ग देखण्यारूपात वापरासाठी खुला झाला आहे.
म्युरल्समध्ये चित्रित केलेल्या प्रसंगांमुळे नागरिकांच्या ज्ञानात भर पडेल
नागरी सुविधांच्या बरोबरीने, नागरिकांच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी निर्माण करणं ही नगरसेवकांची जबाबदारी आहे. इथून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना नक्कीच आनंद वाटावा म्हणून त्याच्या नूतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्याबरोबरच म्युरल्समध्ये चित्रित केलेल्या प्रसंगांमुळे नागरिकांचे मनोरंजन होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशी आशा आहे असं मत यावेळी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
गेली अनेक वर्ष या भुयारी मार्गाची झाली होती दुरावस्था
१६ वर्षांपूर्वी स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्गाचे उदघाटन झाले होते. त्यांनतर काही काळानंतर या भुयारी मार्गाची अतिशय दुरावस्था झाली होती. पाणी साचणे, कचरा पडून राहणारे, विद्युत व्यवस्था बंद पडणे अशा पद्धतीने या भुयारी मार्गाची दुरावस्था झाली होती. मात्र त्यांनतर या भुयारी मार्गाचे काम करून आता त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
भुयारी मार्गात लावण्यात आले सीसीटीव्ही..
स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्गाची पुन्हा दुरावस्था होऊ नये म्हणून महापालिकेचे दोन सफाई कर्मचारी तसेच या भुयारी मार्गात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना आंनद वाटावा व त्यांनी म्युरल्समध्ये चित्रित केलेल्या प्रसंगांची माहिती व्हावी या उद्देशाने याचे नूतनीकरण करण्यात आले आहे.