पुणे - राज्यभरातील शाळा नियोजित 15 जून या तारखेला सुरू होऊ शकलेल्या नाहीत. कोरोना संसर्गामुळे शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. मात्र, या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक शाळा ऑनलाईन पद्धतीने वर्ग भरवत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही आपापल्या घरी मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून शिकवतात.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही नवीन शिक्षण पद्धती रुजत आहे. मुळात मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपपासून मुलांनी दूर रहावे त्यांना या उपकरणाची सवय पडू नये यासाठी पालकांचा कायमच प्रयत्न असतो. मात्र, आता मुलांना ऑनलाईन शिक्षणाच्या निमित्ताने मोबाईल, लॅपटॉप पाहण्याचे लायसन्सच मिळाल्यासारखे झाले आहे.
ऑनलाईन शिक्षण घेत असताना मुलांना काही तास मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसावे लागणार आहे. त्यामुळे मुलांच्या या वाढलेल्या स्क्रीन टायमिंगमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासकरून मुलांच्या डोळ्यावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय इतर ही वेगवेगळे त्रास होऊ शकतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पर्याय नसल्याने करायचे काय? असा प्रश्न पालकांसमोर आहे. याचं संदर्भात वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून काही सूचना दिल्या जात आहेत. त्याचा फायदा निश्चित मुलांना होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.