पुणे - स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये 10 ते 11 जणांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्याला कॉलेज परिसरात लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आंबेगाव खुर्द येथील सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या कॉलेजमध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल - या प्रकरणी सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी चावडा याच्यासह मोहन राठोड, चेतन थोरे, साहिल गायकवाड यांच्यासह सहा अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व दीपक चौधरी याने याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.
काय आहे प्रकरण - या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास उर्फ विकी चावडा याने तक्रारदार अथर्व चौधरी याला फोन करून कॉलेजमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर त्याला दमदाटी करत 'तू माझे ऐकत नाही का? मी भाई आहे या कॉलेजचा' असे म्हणत मारहाण केली. नंतर अथर्वला दुचाकीवर बसवून "थांब तुला जीवे मारून टाकतो, तू माझे ऐकत नाही का? असे म्हणून कॉलेजच्या पार्किंगमधून त्याला बाहेर नेले आणि "मी भाई आहे इकडचा" असे म्हणत लाकडी बांबू व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.