पुणे - एखाद्याच्या आयुष्यात वेळ आणि तारीख याला खूपच महत्त्व असतं. ती वेळ आणि त्या तारखेला माणूस कधीच विसरू शकत नाही, अशी एक तारीख म्हणजे 4 जून. . . ही तारीख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि फडणवीस सरकारच्या कार्यकाळात असलेले तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे हे कधीच विसरू शकत नाहीत. 4 जून 2016 साली भोसरी जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी त्यांना त्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात भाजप वाढवण्यासाठी महत्त्वाचे योगदान असलेल्या नेत्यांपैकी एक असलेले खडसे यांना त्यांनंतर सातत्याने पक्षातील अंतर्गत गटबाजीचा सामना करावा लागला. त्यानंतर शेवटी पक्षाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांना प्रवेश करावा लागला.
राज्यात भाजपचे सरकार स्थापित करण्यात महत्त्वाचे योगदान - २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार स्थापित करण्यात एकनाथ खडसे यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळेच खडसेंना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महसूलसह १२ महत्त्वाच्या खात्यांचे सुभेदार करण्यात आले होते. मात्र, अवघ्या दीड वर्षातच त्यांना स्वीय सहायक गजानन पाटलाचे ३० लाखांचे लाच प्रकरण, दाऊदच्या पत्नीशी संभाषण, जावयाची लिमोझीन गाडी आणि भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरण... अशा आरोपांच्या मालिकेनंतर 4 जूनला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा? - देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. यातीलच पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता. परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी, की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचे समोर आले होते. यानंतर खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
राजकीय पुनर्वसन नाहीच - खडसे यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांचे पुनर्वसन झालेच नाही. शिवाय, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी यांना तिकीट देण्यात आले. त्यांचा पराभव झाला, त्यामागेही पक्षातील काही लोक असल्याची तक्रार खडसेंनी भाजपच्या वरिष्ठांकडे केली होती. मात्र याची पक्षश्रेष्टींनी दखल न घेतल्याने आणि पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे खडसे निराश झाले. त्यातूनच खडसे यांनी अखेर 23 ऑक्टोबर 2020 साली पक्षाला रामराम ठोकला.
राष्ट्रवादीत प्रवेश - भाजप पक्षात राजकीय भविष्य नसल्याबाबत खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. वरिष्ठांकडेही तक्रार केली, मात्र पक्षश्रेष्ठींनीही दखल घेतली नाही. त्यामुळे एकनाथ खडसे एकाकी पडले. त्यातुनच त्यांनी 23 ऑक्टोबर 2020 साली शरद पवार यांच्या उपस्थितीत फडणवीसांवर टीका करत पक्षत्याग करुन राष्ट्रवादीत प्रवेश केला.
ईडी लावली की सीडी लावतो - राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश करण्याच्या वेळी एकनाथ खडसे यांचा एक डॉयलॉग फेमस झाला होता, तो म्हणजे माझ्या मागे ईडी लावली की सीडी लावतो. परंतु त्यानंतरही खडसेंनी सांगितल्याप्रमाणे 'ईडी'ने भोसरी प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली. त्यासंबंधी दोन-तीन वेळा खडसेंची चौकशीही देखील झाली. त्यांनी ही तक्रार रद्दबातल करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, ती अजूनही न्यायप्रविष्ट आहे. पण अजूनही खडसे यांनी सीडी लावली नाही.
ईडीकडून जावयाला अटक - खडसेंची 'ईडी'विरोधातील याचिका न्यायप्रविष्ट असताना ‘ईडी'ने थेट त्यांचे जावई गिरीश चौधरींना अटक केली. भोसरी जमीन खरेदी चौधरी व खडसेंच्या पत्नी मंदाताईंच्या नावाने झाली आहे. त्यामुळे ही कारवाई अपेक्षित असली, तरी धक्कादायक आहे.
6 वर्षांनंतरही दिलासा नाही - खडसेंनी फडणवीस सरकारमधून याच प्रकरणावरून जून २०१६ ला राजीनामा दिला. 6 वर्षे उलटली, तरी भोसरी प्रकरण त्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही. खडसे त्यावर आता कोणता पवित्रा घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.