पुणे - सोमवारी केंद्र सरकारने शौर्य पूरस्कार जाहीर केले. यात पुण्यातील सोनित सिसोलेकर या विद्यार्थ्याला शैक्षणिक प्रकल्पासाठी शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वयाच्या 14 व्या वर्षीच सोनितला हा पुरस्कार मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'मंगळावरची माती लाला का झाली' यावर केलं संशोधन
खरंतर सोनितने एक प्रकल्प केला होता. नासाच्या एका स्पर्धेत 'मंगळावरची माती लाल का झाली' याचं संशोधन केलं आणि दुसरं 'झाडाच्या वाढीवर आवाजाचा परिणाम काय होतो' याचेही संशोधन त्याने केलं आहे. यासाठी सोनितला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोनितच्या आईवडिलांना आणि त्याच्या कुटुंबियांना आनंद झाला असून, त्याला पुढे नेण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याचे मत सोनितच्या आईवडिलांनी व्यक्त केलं.
घरातच केली प्रयोगशाळा
सोनित हा पुण्यातील पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 8वीत शिकत आहे. सोनित याची बाल शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सोनितचे बाबा त्याला लहानपणी पुण्यातील टेकड्यांवर फिरायला घेऊन जायचे, तेव्हा तेथील दगडांकडे तो कुतूहलाने पाहात असत, त्यामध्ये काय आहे हे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. घरात त्याला खेळणी आणल्यावर तो ती तोडून त्याच्या आतमध्ये काय आहे हे उत्सुकतेने पाहायचा. सोनितमधील हे वेगळेपण त्याच्या आई- बाबांनी हेरले. त्यादृष्टीने त्याला पूरक वातावरण निर्माण करून दिले. काही संशोधन त्याने थेट गुहांमध्ये जाऊन केले आहे. तर झाडांवरचे संशोधन करताना त्याने घरातच प्रयोगशाळा निर्माण केली आहे.
भविष्यात खूप पुढं जायचं आहे
ही माझी सुरुवात आहे. घरी मला माझे आई - वडील खूप पाठिंबा देत आहेत. त्यांच्या या पाठिंबाच्या जोरावर भविष्यात खूप पुढं जायचं आहे, अशा भावनाही यावेळी सोनितने व्यक्त केल्या आहेत.