पुणे - 'तु मेरी जोहरा जबी', 'और इस दिल में,' 'चोरीचा मामला' या हिट गाण्यांसोबत 'शिर्डी वाले साईबाबा' अशा भक्तीगीतांना लोक टाळ्या वाजवत दाद देत होते. हा कार्यक्रम कुठे सार्वजनिक ठिकाणी नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये लोकगायक अमर पुणेकर, विनोद धिवार, कल्पना जगताप, विजय साळवी, प्रकाश दळवी यांनी सादर करून रुग्णांना त्यावर डोलायला लावले.
छत्रपती शिवाजी महाराज कोविड हॉस्पिटलमध्ये हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम रंगला. हॉस्पिटलचे संचालक शांताराम खलसे, सहायक पोलीस आयुक्त राजू मोरे, शिवसेनेचे आनंद गोयल, हॉस्पिटल व्यवस्थापक गिरीश घाग, अर्चना प्रधान, चंद्रकांत सरवदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सलीम आळतेकर, रुग्ण हक्क परिषदेचे अपर्णा साठे, यांनी या सदाबहार कार्यक्रमाला उपस्थित राहून कोविड रुग्णांना या लढाईत एकटे नसल्याचे सांगितले.
..म्हणून संगीताच्या कर्यक्रमाचे आयोजन -
रुग्णांना इतर आजाराशी लढताना कुटुंबीय, आप्तेष्ट, मुले - नातवंडे सोबत असतात. मात्र, कोविड रुग्णाला कोणालाही भेटता येत नसल्याने एकटेपणाची जाणीव होते. त्यामध्ये दररोजच्या वेगवेगळ्या तपासण्या, सातत्याने रुग्णाला दिले जाणारे उपचार यामुळे नैराश्य आल्यासारखे वाटते, यातून बाहेर पडण्यासाठी आयोजित केलेल्या गीत संगीताचा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे
चेहऱ्यावरील आनंद हास्य पाहून खूप समाधान वाटले
अनेक विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम केले, मात्र इथे संगीत सेवा करताना लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद हास्य पाहून खूप समाधान वाटले. ऑक्सिजन लावून पडून राहिलेला रूग्ण जेव्हा गीतांचे बोल ऐकून उठून बसला गाण्यांच्या ठेक्यावर टाळ्या वाजवत ताल धरू लागला तेव्हा त्यांची 'इम्युनिटी पॉवर' खऱ्या अर्थाने वाढली असल्याचे जाणवले, असे मत गायक अमर पुणेकर यांनी व्यक्त केले.