पुणे- पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने भरतातील पहिली न्यूमोनियावरील लस विकसित केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सोमवारी या लसीचे लोकार्पण केले, न्यूमोनियावरील ही पहिलीच भारतीय लस आहे. ही लस विदेशी लसीपेक्षा स्वस्त असून, पुढील आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
या लसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमाद्वारे लोकार्पण केले. यावेळी बोलताना हर्षवर्धन यांनी सिरम इन्स्टिट्यूटचे कौतुक केले, आजचा दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, सिरम इन्स्टिट्यूटने न्यूमोनियावरील ही लस विकसित केल्याने संपूर्ण भारतासाठी ही गर्वाची बाब असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. न्युमोनिया या श्वसनासंबंधी आजारामुळे भारतात दरवर्षी पाच वर्षांखालीत एक लाख बालकांचा मृत्यू होतो. त्यामुळे भारतीय बनावटीची न्यूमोनियावरील ही पहिली लस भारतासाठी मोठे यश आहे. जगभरातील विकसनशील तसेच अविकसित देशांना सिरम कमी किंमती विविध आजारांचे औषध पुरवते. अशा शब्दात हर्षवर्धन यांनी सिरमचे कौतुक केले आहे.