पुणे - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यानंतर मराठा समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्योरांच्या फैरी झडत आहेत. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजाच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्याच प्रमाणे मराठा आरक्षणाला मिळालेली स्थगिती म्हणजे केंद्र आणि राज्य सररकारच्या कुटील राजकारणाचा एक प्रकारचा बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया संभजी ब्रिगेडने दिली आहे.
संभाजी ब्रिगेडने आज पुण्यात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी संभाजी ब्रिगेडने मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीवरून राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. यावर तातडीने मार्ग काढला नाहीतर मराठा तरुण नक्षली मार्गाला जातील, अशी भीतीही संभाजी ब्रिगेडने व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणासाठी लाखोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. 50 पेक्षा ज्यास्त मराठा युवकांनी आरक्षणाच्या लढाईत बलिदान दिले आहे. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ते टिकले नाही. त्यामुळे आता पुन्हा समाजावर अन्याय झाला असल्याचे मत ब्रिगेडने व्यक्त केले आहे. राज्यातील महाआघाडी आणि केंद्र सरकार, राज्य भाजप यांच्यातील राजकारणाचा हा बळी आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा खेळ खंडोबा झाला असल्याचा आरोपीही संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला. मराठा आरक्षणावरची ही स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्व तो परी प्रयत्न केले पाहिजेत, असे ही यावेळी सुचित करण्यात आले.