बीड - मराठा समाजाच्या एसईबीसी प्रवर्गातील तलाठी पदाच्या पात्र उमेदवारांना वगळून इतर उमेदवारांना नियुक्ती देण्याचा शासनाने घाट घातला आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला असून नियुक्ती देणार असाल तर सर्वच उमेदवारांना द्या, अन्यथा आंदोलन करू, असे संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल वायकर यांनी म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनही दिले आहे.
'दप्तर दिरंगाई'
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मराठा तरुणांची केवळ दप्तर दिरंगाईमुळे अवहेलना होत असून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. एकाच वेळी प्रसिद्ध झालेली जाहिरात तरीही केवळ बीड जिल्ह्यात प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, की जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 2019मध्ये पदभरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली. यात एसईबीसी प्रवर्गासाठी 9 पदे राखीव ठेवण्यात आली होती. आपण दिलेल्या जाहिरातीनुसार मराठा समाजातील पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल केले, त्यानंतर परीक्षा दिली. याचा निकालही आपण आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रसिद्ध केला. त्यानंतर केवळ दप्तर दिरंगाईमुळे वर्षभरापूर्वी झालेली निवडप्रक्रिया रखडली. त्याचा फटका एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना बसला आहे.
'एसईबीसी उमेदवारांना वगळून नियुक्ती नको'
एकंदरीत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एसईबीसी उमेदवारांना वगळून नियुक्ती देण्यात येऊ नये, अन्यथा संभाजी ब्रिगेड बीडमध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल, असा इशारा वाईकर यांनी दिला आहे.