पुणे - पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्याच्या ( Pune Crime ) आंबेगाव बुद्रुक येथील प्यासा बारच्या पार्किंगमधील गाडी काढण्यावरुन झालेल्या वादात चार जणांनी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या ( Inspector General Police ) मुलाला बेदम मारहाण करुन, त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. नरेंद्र रघुनाथ खैरे (वय- ३३, रा. आंबेगाव बु.) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ( Pune Police ) 5 जणांना अटक केली आहे.
युवराज जंबु कांबळे, ओंकार अशोक रिठे, वैभव पोपट अदाटे, मनोज दत्तात्रय सूर्यवंशी, विष्णु कचरुन कदम (रा. नऱ्हे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहे.
आंबेगाव बु येथील साई विश्व सोसायटी, न्यू प्यासा बार समोरील पार्किंगच्या जागेत आरोपींनी संगनमत करुन पार्किंगमधील गाडी काढण्याचे कारणावरुन नरेंद्र खैरे याच्या शरीराच्या अत्यंत नाजूक अवयवावर वारंवार हाताने ठोसे मारुन अंतर्गत गंभीर दुखापत करुन त्याला जिवे ठार मारले आहे. त्यानंतर तिघा जणांनी त्याला उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. हा प्रकार विष्णु कदम याने समक्ष घडलेला पाहिला, असे असतानाही त्यांनी कोणतीही खबर दिली नाही. त्यांना वेळीच मदत मिळाली असती, तर त्यांचा जीव कदाचित वाचू शकला असता. म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपींनी नरेंद्र खैरे याच्या खिशातील पाकीट, मोबाईल, हेडफोन इ. वस्तू चोरुन घेऊन गेले आहेत.
मंगळवारी सकाळी श्री साई मोटर्स येथे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर त्यांना या सर्व प्रकारचा उलघडा झाला आहे.
हेही वाचा- COVID19: भारतात गेल्या 24 तासात 14,506 नवीन कोरोना रुग्ण, 30 जणांचा मृत्यू