पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात आज '८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यातील कात्रज परिसरात असलेल्या एका शाळेच्या आवारात हे चित्रीकरण होते. या कार्यक्रमाला भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर हेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलण्यास नकार दिला.
यावेळी बोलताना '८ दोन ७५, फक्त इच्छाशक्ती हवी' या चित्रपटातील अभिनेत्री संस्कृती बालगुडे म्हणाली, राज ठाकरे इथे आले, त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमच्या सर्वांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी 'चाची 420' चित्रपटानंतर ते प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपस्थित राहत असल्याचे सांगितले. चित्रपटातील अभिनेता शुभंकर तावडे म्हणाला, अमोल मोघे नामक मुलाची भूमिका मी या चित्रपटात करतोय. अमोल हा वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. महाविद्यालयामध्ये त्याचे मित्रमैत्रिणी, त्यांच्या गमतीजमती यावर हा चित्रपट आधारित आहे.