पुणे - वर्ष 2022 सालचा पुण्यभूषण पुरस्कार (Punyabhushan award 2022) ज्येष्ठ उद्योजक आणि समाजसेवक नितीन देसाई (Nitin Desai) यांना प्रदान करण्यात येणार आहे. यासंदर्भातली माहिती पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी दिली आहे. पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे (Punyabhushan Foundation) गेली 32 वर्षे सातत्याने हा पुरस्कार दिला जातो. देशासह परदेशातही हा पुरस्कार प्रतिष्ठेचा आहे.
स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप -
विविध क्षेत्रातील आपल्या अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव जगभर पोहचवणाऱया पुणेकरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल नितीन देसाई यांची यंदाच्या पुण्यभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे. स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे.
1 जुलैनंतर प्रदान करणार पुरस्कार -
यंदाचा हा पुरस्कार 1 जुलैनंतर होणाऱया खास समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या वीर जवानांचा गौरव देखील यावेळी करण्यात येणार आहे. त्यामध्ये हवालदार मोहम्मद फैय्याज आलम, लान्स नाईक जयेंद्र भेंडेरकर, लान्स नाईक एम.जे.चाको, गनर समशेरसिंग आणि शिपाई वलसालन नादर यांचा गौरव करण्यात येणार आहे.