पुणे - फ्रान्स येथील १०० वर्षांपूर्वीच्या जुन्या ऐतिहासिक काळातील भव्य गाड्यांचे प्रदर्शन पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. दि असोसिएशन फॉर रेसिंग अँड मोटार स्पोर्ट्स यांच्यावतीने बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील केंजळे बिझनेस कॉपोर्रेट सेंटर येथे विंटेज आणि क्लासिक ओल्ड मोटारबाईक व कारचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये महायुद्धाच्या काळातील म्हणजे १९३९ सालातील रुबाबदार फोक्सवॅगन कार, १९२० सालातील ऐटीत उभी असलेली निळ्या रंगाची कॅनॅडियन ओव्हरलॅंड, ४० वर्षांपूर्वीची मर्सिडीज, ६० व्या दशकातील साईड कार, याशिवाय १९३५ सालापासूनच्या, हिंद मोपेड, हितोडी, सम्राट, कायनेटीक स्पार्क, हिरो मॅजेस्टीक या मोटार बाईक, १९५० सालातील एनएसयू क्विकली, अशा अनेक ऐतिहासिक काळातील गाड्या बघायला मिळणार आहे.
'१०० पेक्षा अधिक गाड्या प्रदर्शन' -
सन १९२० ते १९९० या काळातील १०० पेक्षा अधिक गाड्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. नॉर्टन, वेलोसेट, ट्रायम्फ, बीएसए, एरियल, रॉयल, एनफिल्ड, जावा, येझदी, राजदूत, यामाहा, वेस्पा, लॅम्ब्रेटा या गाड्यांचा समावेश प्रदर्शनात आहे. आयुष्यात पहिल्यांदा जी गाडी खरेदी करतो, त्यावर प्रत्येकाचे प्रेम असते. ती गाडी सहसा आपण कधी विकत नाही. अशाच आपल्या गाड्यांवर अतोनात प्रेम करणाऱ्या मोटारप्रेमींच्या गाड्या या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये १९२० सालापासून लोकांनी अतिशय प्रेमाने जपून ठेवलेल्या चांगल्या स्थितीतील गाड्या आहेत. प्रदर्शनातील सहभागी संग्राहकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती कमलेश दवे यांनी दिली.
जुन्या गाड्या पाहण्याचे साक्षीदार होण्याची संधी
रुबेन सोलोमन, सॅम सोलोमन आणि विनीत केंजळे यांच्या गाड्यांचे प्रदर्शन यावेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नितीन सहस्त्रबुद्धे ,श्रीनिवास ठाकूर, शेखर सौदेकर, स्वीकार राठोड, राहुल मोकाशी, संदीप कटके आणि इतर पुण्यातील संग्रहकांच्या गाड्या या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत. दुर्मिळ, विंटेज, युद्धपूर्व, युद्धोत्तर, क्लासिक आणि भारतीय क्लासिक्स या श्रेणीमध्ये गाड्यांचे विभाजन करण्यात आले आहे. निवडक आणि काही हौशी दिग्गजांनी ठेवलेल्या जुन्या काळातील या भव्य जुन्या गाड्या पाहण्याचे साक्षीदार होण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे.
हेही वाचा - आगामी महापालिका निवडणुकीत तीन नगरसेवकांचाच प्रभाग असणार - अजित पवार