पुणे - शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासनाने 1 जून पासून नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार शहरातील जनजीवन पूर्ववत करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुण्यातील सर्व प्रकारची दुकाने 1 जूनपासून सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन 15 जून पर्यंत कायम ठेवण्याची घोषणा केली होती. ही घोषणा करत असतानाच त्यांनी कमी रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पुढील दहा दिवसांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार पुणे शहरातील सर्वच दुकाने सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुढील दहा दिवसांसाठी ही नियमावली असणार आहे. त्यानंतर पुढील परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील अनेक दिवसांपासून दुकाने उघडण्याची परवानगी मागणाऱ्या व्यापाऱ्यांना या निर्णयामुळे काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
पुणे महापालिकेच्या नवीन नियमानुसार -
- अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
- शहरातील हॉटेल व्यावसाय केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहील.
- पुणे महापालिका हद्दीतील सर्व बँका या कामाचे सर्व दिवस सुरू राहतील.
- दुपारी तीनवाजे नंतर वैद्यकीय सेवा व इतर अत्यावश्यक कारण अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.
- ई-कॉमर्स मार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरू करण्यास मुभा राहील.
- मद्यविक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील.
- सर्व शासकीय कार्यालये 25% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.