पुणे- महापालिकेने शहरात विविध 16 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी केली होती. मात्र, राज्य शासनाने केवळ 8 ठिकाणी लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. शिवाय महापालिकेने मागणी केलेल्या संख्येपेक्षा अर्ध्याच लसी मिळाल्या असून, उद्या 800 वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात सरकारी, निमसरकारी व खासगी क्षेत्रात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. यानंतर दुसर्या टप्प्यात महापालिकेचे कर्मचारी, पोलीस, नागरिक संरक्षण दल, गृहरक्षक दलातील अधिकारी व कर्मचार्यांना लस देण्यात येईल. यानंतर पन्नास वर्षे वयावरील व्यक्तींना आणि शेवटच्या टप्प्यात सामान्य नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व आरोग्याधिकारी व कर्मचार्यांची यादी तयार करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर 1 लस देणारा, दोन पर्यवेक्षक आणि एका सुरक्षारक्षकासह पाच जणांची टीम असणार आहे. पोर्टलवर ज्यांनी नोंदणी केली आहे, त्यांना लसीकरणाचा दिनांक आणि वेळीची माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येणार आहे.
शहरातील 55 हजार सेवकांना ही लस दिली जाणार असून, यामध्ये 11 हजार 500 हे सरकारी सेवक आहेत. शहरामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 1 लाख 15 हजार 825 इतक्या लसी लागणार आहेत. मात्र, राज्य सरकारने शहरातील 8 रुग्णालयांमध्ये लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्रत्येक सेंटरवर 100 या प्रमाणे एका दिवसात 800 कर्मचार्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लस दिलेल्या कर्मचार्यांचा अहवाल शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार पुढील लसीकरण केले जाणार असल्याचे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले आहे.
या रुग्णालयात होणार लसणीकरण
1) राजीव गांधी रुग्णालय, येरवडा
2) कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ
3) ससून रुग्णालय, पुणे स्टेशन
4) सुतार दवाखाना, कोथरूड
5) दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा
6) रुबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता
7) नोबल हॉस्पिटल, हडपसर
8) भारती हॉस्पिटल, धनकवडी