पुणे - पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी सहकारनगर परिसरातून त्याची अंत्ययात्रा काढली होती. या अंत्ययात्रेत 200 हून अधिक जण दुचाकीवरून सहभागी झाले होते. सहकारनगर पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि अन्य एका पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे यांची आर्थिक व सायबर गुन्हे शाखेत, गुन्हे निरीक्षक राजेंद्रकुमार कदम यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. तर गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांची सहकारनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
काय आहे प्रकरण..?
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 15 मेच्या मध्यरात्री बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाला. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या घरापासून वाघाटे याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. मोठ्या संख्येने वाघाटेचे समर्थक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अंतयात्रेचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर सर्व बाजूने टीका होऊ लागली. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक होत या प्रकरणी 200 जणांविरोधात गुन्हे दाखल केले. आतापर्यंत या तीनशे सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 50 हून अधिक दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आले आहेत. तर यातील उर्वरित आरोपींचा शोध अजूनही सुरू आहे.
हेही वाचा - पुण्यात कडक निर्बंधातही सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी अन् दुचाकी रॅली