पुणे – कोरोना महामारी असताना नियमभंग करणे पुण्यातील दोघांना महागात पडले आहे. टाळेबंदीच्या काळात संचार बंदीचे आदेश असतानाही आदेश झुगारून हॉटेल सुरू ठेवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कोंढवा परिसरात गुरुवारी रात्री ही कारवाई केली. हॉटेल चालक अनुज घनश्याम चौरसिया (वय 34) आणि स्वयंपाकी प्रकाश ताराचंद खत्री (वय 30) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी 23 जुलैपर्यंत संपूर्ण शहरात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु असे असतानाही कोंढव्यातील हॉटेल 'नाईट क्रेवेर्स' सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी फेब्रुवारी या हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी पोलिसांना हॉटेल सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी हॉटेल चालक आणि स्वंयपाकी या दोघांनाही ताब्यात घेतले.
टाळेबंदी असतानाही आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी हॉटेल सुरू ठेवले होते. दोन्ही आरोपींवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना 2020 व महामारी कायद्यानव्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
गांधीगिरीचाही पोलिसांकडून वापर-
मंगळवारपासून पुण्यामध्ये दुसरा टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. परंतु असे असले तरीही काही नागरिक मात्र रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसून येत आहे. अशा नागरिकांसाठी पुणे पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला आहे. पुण्यातील बिबवेवाडी आणि कात्रज परिसरात टाळेबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी बुधवारी गांधीगिरी मार्गाने धडा शिकविला आहे.