पुणे - नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात एकत्रित कारवाया (काेबिंग ऑपरेशन) करून गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. बुधवारी रात्री सायंकाळी दहा ते गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान कारवाया करण्यात आल्या. यादरम्यान पोलिसांनी दाेन हजार 893 गुन्हेगारांची तपासणी केली असता त्यापैकी 756 गुन्हेगार मिळून आले. प्रतिबंधात्मक कारवाईच्या 414 खटल्यांमध्ये 443 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 16 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी
या कारवाईत 176 जणांना सीआरपीसी कलम 149 नुसार नाेटिसा बजाविण्यात आल्या आहेत. शस्त्रास्त्र कायद्यानुसार एकूण आठ गुन्हे दाखल करून आठ आराेपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून सात पिस्टल, एक गावठी कट्टा व नऊ काडतुसे असा दाेन लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल करून त्यात 66 आराेपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 48 काेयते, 14 तलवारी, एक कुकरी, पाच पालघन, एक चाकू, दाेन सत्तूर, दाेन लाकडी साेटे असा 17 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तडीपार आदेशाचा भंग
महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम 142 प्रमाणे 16 तडीपार व्यक्तींवर तडीपार आदेशाचा भंग करून पुणे शहरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून आल्याने त्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्र पाेलीस कायदा कलम 122 प्रमाणे संशयितरित्या फिरणाऱ्या 28 जणांवर कारवाई करण्यात आली. सिंहगड पाेलीस ठाण्याकडून एका आराेपीला अटक करून त्याच्या ताब्यातून सात लाख 56 हजार रुपये किंमतीचे 63 ग्रॅम 'एमडी' जप्त केले आहे. तर, काेंढवा परिसरात 18 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
याशिवाय वाहन चाेरविराेधी पथकाने दाेन संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांचेकडून चाेरीच्या तीन लाख 20 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. फरासखाना पाेलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट चारच्या पथकाने दाेन लाख 51 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने काेरेगाव पार्क परिसरात एक गुन्हा दाखल करून दाेन आराेपींना अटक केली आहे.