पुणे – कोरोना महामारी आणि टाळेबंदीने अनेकांचे उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. असाच फटका बसलेल्या एका इस्टेट एजंटने सोनसाखळी चोरीचा मार्ग निवडला. त्यानंतर अवघ्या तासाभरात पोलिसांनी त्याला जेरबंद केले. मोहम्मद आतिब इक्बाल शेख (वय 26) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी घरकाम करणारी एक महिला काम आटोपून घराच्या दिशेने निघाली होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या मोहम्मद इक्बाल शेख त्याने महिलेच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. महिलेला चकवा देवून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. या महिलेने जवळील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये घटनेसंबंधी माहिती दिली. पोलिसांनीही गुन्हा दाखल करून तातडीने आरोपीचा शोध सुरू केला.
पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक मिळविला. आरोपी हा हिरव्या रंगाच्या दुचाकीवरून आला होता, अशी महिलेने पोलिसांना माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोन्याच्या दुकानासमोर तपास घेतला. तेथील एका दुकानासमोर हिरव्या रंगाची दुचाकी दिसली.
पोलिसांनी हिरव्या रंगाच्या दुचाकीच्या मालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने सोनसाखळी चोरल्याचे कबूल केले आहे. समर्थ पोलिसांनी जलद गतीने तपास करत एका तासात आरोपीला अटक केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली टाळेबंदी १ खुली करण्यात आली आहे. असे असले तरी अजूनही विविध उद्योग व व्यवसाय अद्याप सुरळित सुरू झाले नाहीत. राज्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेला टाळेबंदीने फटका बसला आहे.