पुणे - राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या शहरात सामाजिक सुरक्षा विभागाने उच्चाभ्रू परिसरात छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. बाणेर येथील एका प्रसिद्ध हॉटेलसमोर हा प्रकार सुरू होता. पुणे पोलिसांनी यावेळी वेश्या व्यवसायातील ३ मुलींची सुटका केली. तर या मुलींकडून देहविक्री करवून घेणाऱ्या एजंट महिलेला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेली राबीया उर्फ सोनाली इंदादूल मंडल असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस कर्मचारी नरेश बलसाने यांना बाणेर येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली. सामाजिक सुरक्षा विभागाने बाणेर रस्त्यावरील हॉटेल ग्रीन पार्कच्या गेटसमोर छापा टाकला. त्यावेळी राबीया उर्फ सोनाली इंदादूल मंडल ही ३ तरुणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्या ठिकाणाहून मुंबई २ आणि गुजरात येथील एका तरुणीची सुटका केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना देहविक्रय करण्यासाठी आणल्याचे निष्पन्न झाले. या तीनही तरुणींची सुटका करून सुरक्षिततेसाठी त्यांना महंमदवाडी येथील रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले आहे.