पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात अज्ञात १० जणांच्या टोळक्याने तब्बल २० वाहने कोयता, लाकडी दांडके आणि विटांनी फोडल्या आहेत. तर एक जणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले आले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे.
मध्यरात्री उशिरा या टोळक्यांनी आकुर्डी परिसरातील जाधव पार्क येथे मोकळ्या जागेत पार्क केलेल्या २० गाड्या धारदार शस्त्रांनी फोडल्या आहेत. टोळक्याने धुडगूस घालत हा प्रकार केल्याचे सांगण्यात येत आहे. रुपेश श्रीराम काळभोर यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून काही रुपये आणि महत्वाची कागदपत्रे हिसकावून घेऊन गेली आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. तोडफोड केलेल्या वाहनांमध्ये स्कुल व्हॅन आणि इतर वाहनांचा समावेश आहे. सर्वसामान्य जनतेच्या वाहनांची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले असून त्याच्या भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
या घटनेप्रकरणी रुपेश श्रीराम काळभोर यांनी निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी भेट दिली असून लवकरात लवकर आरोपीला जेरबंद करू असे आश्वासन दिले आहे. या घटनेचा अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.