पुणे - देशात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे असून राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबई व पुणे शहरात रूग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. सध्याची परिस्थिती बघता येत्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता सरकारने शहरातील रुग्णालयांमधील जास्तीत जास्त बेड (८०% पर्यंत) कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, खासगी रुग्णालये यासाठी शासनाकडे अतिरिक्त भाड्याची मागणी करत आहे. अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे.
कोरोना रुग्णांवर उपचार करताना दोन रुग्णांच्यामध्ये एक बेड रिकामा ठेवला जातो. पुण्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी दोन रुग्णांच्यामध्ये रिक्त ठेवण्यात येणाऱ्या बेडसाठी प्रशासनाकडे भाड्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेने देखील या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र, यामुळे काही प्रश्न निर्माण होतात. रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे शासन स्तरावरून दिली जातात. यामध्ये रुग्णालयांनी आता अतिरिक्त मागणी करणे व त्याला अधिकाऱयांनी सकारात्मक प्रतिसाद देणे निर्बुद्धपणाचे आहे. मात्र, यामागे नक्कीच काहीतरी छुपे अर्थकारण असल्याचा आरोप शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केला.
या प्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करावी यासाठी मनसेच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देखील देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर अधिकारी आणि रुग्णालये दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली.