पुणे - पुण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याविरोधात लढण्यासाठी पुणे महापालिका प्रशासन आधीच सज्ज आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये वाढ झाल्यास महापालिका प्रशासनाने त्यासाठी आधीच तयारी करून ठेवल्याची माहिती पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जरी रुग्ण संख्या वाढली तरी त्यासाठी महापालिका प्रशासनाने पूर्णपणे तयारी केली आहे. सध्या महापालिकेच्या व सरकारी सर्व दवाखान्यांमध्ये मिळून २,५०० खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरांमध्ये रुग्ण वाढून खाटांचा प्रश्न निर्माण झाला तर पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू करता येईल. पुणे शहरामध्ये एकूण वीस हजार खाटांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
नागरिकांसाठी पुढचे दोन महिने काळजीचे-
पुणेकर नागरिकांनी महापालिका प्रशासनाला वेळीवेळी सहकार्य केले आहे. पुढील 2 महिने आपल्यासाठी काळजीचेआहेत. पुणेकर नागरिकांनी पुढील 2 महिने स्वतः ची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेतली तर दुसरी लाटही येणार नाही. त्यामुळे पुणेकरांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करत सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, असे आवाहन यावेळी महापौरांनी केले आहे.
दुसऱ्या लाटेचे प्रमाण जास्त नसेल-
गेल्या सात महिन्यांमध्ये पुणे शहरामध्ये सर्वाधिक 17 हजार 500 कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. एका दिवसात सर्वाधिक 2 हजार 200 रुग्ण शहरात आढळून आले होते. विविध स्तरावर झालेल्या पाहणीतून शहरांमधील नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे करोनाची दुसरी लाट आली तरी त्याचे प्रमाण जास्त नसेल, असा अंदाज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.
शहरात 13 हजार 815 खाटा रिकाम्या-
पुणे शहरात सध्या एकूण 19 हजार 442 इतक्या खाटा आहेत. यापैकी 13 हजार 815 खाटा रिकाम्या आहेत. ऑक्सिजनची व्यवस्था असणाऱ्या 4 हजार 84 खाटा, अतिदक्षतेच्या 752 तर व्हेंटिलेटरच्या 370 खाटा रिकाम्या आहेत.
नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज-
महापालिका प्रशासन सज्ज असले तरीही नागरिकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या, नागरीक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत आहे. त्यामुळे सर्व स्तरावर काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही यावेळी महापौरांनी म्हटले आहे.
शहरातील कोविड सेंटर बंद करण्याचा पालिकेचा निर्णय-
मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने विमान नगर परिसरात उभारलेले साडेतीन हजार क्षमतेचे कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे शहरातील हॉस्पिटलमधील काही बेड रिकामे पडून आहेत. त्यामुळे मनुष्यबळ व्ववस्थापनाने कोविड केअर सेंटर चालविण्याचा खर्च वाचवण्यासाठी सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.