पुणे - शहरातील काँग्रेसभवनसमोर असलेल्या अमृतेश्वर घाटावर गणपती विसर्जनावेळी बोट उलटून तिघे नदीपात्रात पडले होते. या तिघांनाही अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले असून, दिवसभरात अशा प्रकारच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी 9 जणांचे प्राण वाचवले आहेत.
गणपती विसर्जनादरम्यान वृदेश्वर घाटाजवळ एक तरुण बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे व जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे यांनी बुडणाऱ्या तरुणाला सुखरूप पाण्याबाहेर काढले. तसेच औंध विसर्जन घाटावर विसर्जनादरम्यान पाय घसरल्याने 14 वर्षीय मुलगी पाण्यात बुडाल्यानंतर, स्थानिक अग्निशमन अधिकारी कमलेश सनगाळे यांना संबंधित मुलीला वाचवण्यात यश आले आहे. याच ठिकाणी एका 54 वर्षीय व्यक्तीला बुडताना चंद्रकांत बुरुड यांनी वाचवले.
हेही वाचा पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा उत्साह शिगेला; न्यायालयाचा आदेश झुगारून पुण्यात डिजेचा दणदणाट
तसेच अग्निशमन दलाचे जवान योगेश चव्हाण व जीवरक्षक सनी भोकरे, विशाल भोसले यांनी वारजे घाटावर मंडळासोबत आलेल्या बालाजी पवारचे (वय 18) प्राण वाचवले आहेत. ही घटना रात्री नऊ वाजता घडली.