पुणे - विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते गृहविलगीकरणात असल्याची माहिती आहे. सौरभ राव यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोनही डोस घेतले होते. त्यांनतरही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
सौरभ राव हे विभागीय आयुक्त असल्यामुळे पुणे जिल्ह्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करीत आहेत. विभागातील रुग्णालयांना ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दररोज विभागीय आयुक्त कार्यालयात बैठका घेत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपासून ताप येत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. रविवारी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते क्वारंटाईन झाले. तसेच संपर्कात आलेल्यांची स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सौरभ राव यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. यापूर्वी पहिला डोस घेतल्यानंतर काही दिवसांनी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवस उपचारानंतर बरे झाल्याने ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. दर शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोरोना आढावा बैठकीला ते हजर राहत असतात.