पुणे - शहर आणि जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहाता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादकांना दिल्या आहेत. कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी उत्पादकांनी ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करावी असे देखील सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; भंगाराच्या सहा गोदामांना भीषण आग
पुणे जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत सूचना करण्यात आल्या.
सध्या मुबलक ऑक्सिजन उपलब्ध
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून उत्पादकांकडे 790 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे सध्यातरी ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र, पुण्यासह राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
आगामी काळासाठी ऑक्सिजनचे नियोजन आवश्यक
वाढत्या कोरोना रुग्णांना आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करावी. तसेच अधिकाधिक ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी नियोजन करावे, जेणेकरुन भविष्यात देखील ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - ठाकरे सरकारकडून 600 कोटी रुपयांचा एसआरए घोटाळा; किरीट सोमैयांचा आरोप