पुणे - कोरोना रुग्णालय आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
राज्यात तसेच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोवीड-19 रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सिजनचे उत्पादन होऊनसुद्धा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तुटवडा होत असल्याचे समोर आले. भविष्यात कोवीड-19 रुग्णसंख्येत वाढ होईल आणि ऑक्सिजनची गरज देखील वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली आहे.
समितीच्या जबाबदाऱ्या
निवासी उपजिल्हाधिकारी (पुणे) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून नियोजन करणे
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे यांनी उत्पादकांशी समन्वय व बॉटलींग प्लांटमधून वाटपाचे नियोजन करणे
महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी उत्पादनात वाढ व उत्पादकांशी समन्वय साधणे
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे व पिंपरी यांनी वाहतूक-टॅंकर समन्वय राहण्याबाबतचे नियोजन करणे
जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खासगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार संकलित करावी आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना द्यावी
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी जिल्हयातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका, आणि खासगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सिजनची मागणी नोंदवणे