पुणे - मागील काही दिवसांपासून फेसबुकवर 'कपल चॅलेंज' हा ट्रेंड भलताच व्हायरल झालाय. फेसबुकचा वापर करणाऱ्यांनीही या ट्रेंडला प्रतिसाद देत पती-पत्नींचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोजमधले फोटो टाकून एकमेकांना चॅलेंज दिले. मात्र, सायबर पोलिसांनी याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.
सोशल मीडियावर कधी कोणता ट्रेंड व्हायरल होईल, याचा नेम नाही. मागील काही दिवसांपासून या 'कपल चॅलेंज'ने भलताच धुमाकूळ घातलाय. मात्र सोशल मीडियावर टाकलेले फोटो चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर, यातून फसवणूक होऊ शकते. तसेच, यातून गुन्हेगारी कृत्य घडू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
कपल चॅलेंजवाल्यांना गुन्हेगारांनी चॅलेंज केले तर, कपल चॅलेंजचे 'खपल चॅलेंज' होईल. त्यामुळे सोशल मीडियावरील कुठलीही चॅलेंज स्वीकारण्याआधी विचार करा, असे आवाहन पोलिसांनी ट्विटच्या माध्यमातून केले. अशा प्रकारचे कुठलेही चॅलेंज स्वीकारताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा पुणे सायबर पोलिसांनी या ट्विटरद्वारे दिला आहे.
हेही वाचा - पूस धरणात सापडलेल्या 'त्या' मृतदेहाचे गुन्हेगार गजाआड
सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या फोटोंचा गैरवापर झाल्याचे यापूर्वी अनेक घटनांमधून उघड झाले आहे. सूड उगवण्यासाठी, ब्लॅकमेलिंगसाठी अशा फोटोंचा वापर करण्यात आल्याचे यापूर्वी पोलीस तपासातून उघड झाले आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे पती-पत्नीच्या नात्यात वितुष्ट आल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. हे फोटो चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागले तर, त्याचा गैरवापरही होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा - कोरोनाबाधित रुग्णांना साडेपाच हजारांत मिळणार प्लाझ्मा बॅग - आरोग्य मंत्री