पुणे : जिल्हा प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्या, रस्त्यांवर थुंकणाऱ्या नागरिकांवर महापालिका, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मागील एका आठवड्यात ८९४ जणांवरील कारवाईत पाच लाख ७२ हजार ४२० रुपये वसूल करण्यात आले आहेत.
शहर पोलिसांनी ५० जणांना केला दंड
पुणे महापालिका प्रशासनाने ९३ जणांवर कारवाई करीत ७५ हजार ७२० रुपये वसूल केले आहेत. पुणे शहर पोलिसांनी ५० जणांकडून २५ हजार रुपये वसूल केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. तर पिंपरी पोलिसांनी तब्बल ५२४ जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख ६३ हजार रुपये वसूल केले आहेत. पुणे ग्रामीण भागात ग्रामपंचायतींनी कारवाई केली नाही पण पोलिस विभागाने २१८ जणांकडून एक लाख ४ हजार २०० रुपये दंड वसूल केला. जिल्ह्यातील नगरपालिकांनी केवळ नऊ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून चार हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कारवाईचा वेग वाढवला
शहरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने महापालिका कामाला लागली आहे. सध्या नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाल्याचे पाह्यला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांकडून मास्कचा वापर कमी झाला आहे. यामुळे कोरोना प्रसार होण्याची शक्यता आल्याने महापालिकेने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी दिली.
जिल्ह्यातील कारवाई आणि दंडवसुली
पुणे मनपा ३०,८१४ कारवाया १,४९, १९, ७७० रुपये दंड
पुणे पोलिस ५,३७,८५६ कारवाया २६,४०,५२,८५० रुपये दंड
पिंपरी-चिंचवड मनपा २६,८८७ कारवाया १,७४, ७०, ४९८ रुपये दंड
पिंपरी-चिंचवड पोलिस ८६,३३४ कारवाया ४,५६, १२,८०० रुपये दंड
ग्रामपंचायती ७०,७०५ कारवाया २,३१,७३,८५० रुपये दंड
ग्रामीण पोलिस १,६७,८७३ कारवाया ६,२३,०५, ७७० रुपये दंड
नगरपालिका ८४,२०३ कारवाया २,९८, ७६, ७४४ रुपये दंड