पुणे - राजमाता जिजाऊ गर्जना, लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी हे चित्तथरारक साहसी खेळ आणि मार्शल आर्ट प्रात्यक्षिकाने उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. निमित्त होते भैरवी सोशल फाउंडेशन आणि मोरया नर्सिंग होमच्या वतीने महिला दिनानिमित्त आयोजित 'जागर 2022'मध्ये विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी वय वर्ष 4 ते 86 वयोगटातील राज्यातील निवडक 16 महिलांचा 'भैरवी महिला समाजरत्न पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मोरया नर्सिंग होमच्या अध्यक्षा डॉ. सुचेता भालेराव, डॉ. सचिन भालेराव, आमदार नीलेश लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके, शशिकला कुंभार, नेहा कदम, मनीषा कदम, डॉ. सुनील जगताप, डॉ. नीलेश जगताप, डॉ. सुनील इंगळे, राजू शेळके, डॉ. शाल्मली खुणे, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह 'सरसेनापती हंबीरराव' चित्रपटाची टीम आदी उपस्थित होते.
यावेळी सचिन गवळी यांनी शिवागर्जना व राजमाता माँ साहेब जिजाऊ गर्जना सादर केली. फिरंगोजी शिंदे मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी दांडपट्टा, तलवारबाजी हे चित्तथरारक साहसी खेळ सादर केले. तर योद्धा मार्शल आर्टच्या वतीने स्वसरंक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
'जागर 2022'चा एक भाग म्हणून भैरवी सोशल फाउंडेशन व मोरया नर्सिंग होमच्या वतीने महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जवळपास 500 महिलांच्या हिमोग्लोबिन, थायरॉईड, ब्लड शुगर आदी तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये ज्या हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या महिलांनी नर्सिंग होमच्या वतीने एक महिन्याचे औषध मोफत देण्यात आले.
हेही वाचा - 100 Crore Extortion Case : सीबीआयकडून संजीव पालांडे, सचिन वाझे यांना अटक