पुणे - पुणे तिथे काय उणे, हे नेहेमीच म्हटले जाते. याची प्रचिती अनेक उदाहरणांतून समोर येत असते. पुण्यात आपलं छंद जोपासण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नसतो. असाच एक अवलिया आपला छंद जोपासण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना सुविचारांचे धडे देत आहे. विशेष म्हणजे या दुकानदाराची वेशभूषा आजच्या या परिस्थितीत एक आगळावेगळा संदेश देत आहे. त्या अवलियाचे नाव आहे राजकुमार सोनवणे.
हेही वाचा - Lal Mahal : लाल महाल लावणी प्रकरण.. वैष्णवी पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
टपरी की सुविचाराचे दुकान - पुण्यातील घोरपडे पेठ येथे राजकुमार यांचे बुट पॉलिशचे दुकान आहे. या ठिकाणी तुम्हाला सुविचार लिहिलेले दिसतील. डोक्यावर मुस्लीम धर्मीय टोपी, कपाळावर टिळा, आणि गळ्यात निळी शाल घालून चप्पल शिवत राजकुमार हा येणाऱ्या ग्राहकाला सुविचार म्हणत आपला छंद जोपासत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे मार्मिक वाचून लागले छंद - पुरंदर तालुक्यातील पुळवे हे राजकुमार सोनवणे याचे मूळगाव. लहानपणापासून वडिलांना मदत म्हणून शाळेत असतानाच चांभाराचे धडे राजकुमार यांनी घेतले. दहावी नापास झाल्यानंतर त्यांनी वडिलांचा बूट पॉलिशचा धंदा पुढे नेला. पण लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांचे मार्मिक वाचत असताना राजकुमार यांना सुविचारांचा छंद लागला. काही वर्षे एलआयसीत काम केल्यानंतर राजकुमार यांनी पुन्हा वडिलांचा व्यवसाय सुरू केला. आणि गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सोनवणे हे घोरपडे पेठ येथील टपरीत आपला छंद जोपासत जोपासत चप्पल तसेच बुटांना टाचे मारत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी सुविचारांचे कागदे टपरीभर लावले असले तरी येणाऱ्या ग्राहकांना ते सुविचारांचे धडे देत आहेत.
अशी आहे टपरी - ही टपरी आकर्षक नव्या चपलांबरोबर सुविचारांनी सजली आहे. आळस हा माणसाचा आजार आहे, वाईट व्यसन सोडण्यासाठी चांगले व्यसन लावू या, प्रेमाने हृदय स्थिर राहातो, इतिहास देशाचा अलंकार, असे कित्येक सुविचार राजकुमार यांनी आपल्या दुकानात लावले आहेत. विशेष म्हणजे, एक नव्हे तर 4 ते 5 सुविचार हे इंग्रजीत देखील आहेत आणि टपरीबाहेर एक कुंडी त्यात झाड आणि त्याच्या शेजारी लिहिलेले निसर्ग आई सारखा अशी पाटी. त्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना एक चांगला संदेश मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशभरातील राजकीय वातावरण तापलेल असताना जाती जातीत तेढ निर्माण केले जात आहे. अशातच सोनावणे हे एक बूट पॉलिश करणारे जरी असले तरी ते सामाजिक संदेश देत आहेत. ते सकाळी सकाळी दुकानात आले की देवपूजा केल्यानंतर डोक्यावर मुस्लीम धर्मीय टोपी घालतात. मंदिर मस्जिद सब जगहा चप्पल जाती..वही चप्पल मेरे पास सिने आती असे म्हणत सामाजिक संदेश आणि एकोप्याने राहण्याचा संदेश ते देत आहेत.
हेही वाचा - VIDEO : सुऱ्याने हल्ला करून दागिन्याच्या दुकानात चोरीचा प्रयत्न.. सराफा व्यावसायिक जखमी