देहू (पुणे) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत दाखल झाले आहेत. त्यांनी वारकऱ्यांना संबाधित केले. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे या अभंगाचे महत्त्व सांगून पंतप्रधानांनी वारकऱ्यांनी केलेल्या स्वागताचे आभार मानले.
तुकाराम महाराजांचा उपदेश राष्ट्रभक्ती, समाजभक्तीसाठी महत्त्वाचा - आज येथे संत चोखामेळा तसेच त्यांच्या परिवाराने रचलेल्या सार्थ अभंगगाथेचे माझ्या हस्ते प्रकाशन करण्याचे मला सौभाग्य लाभले. या सार्थ अभंग गाथेमध्ये संत परिवाराच्या ५०० पेक्षा जास्त अभंग रचनांना सोप्या भाषेत अर्थासहित सांगण्यात आले आहेत. संत तुकाराम सांगायचे की, 'उच निच काही नेणे भगवंत | तिष्ठे भाव रक्षी देखोनिया' समाजात उच्च नीचतेचा भेदभाव करणे हे पाप आहे. त्यांचा हा उपदेश भक्तीसाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच हा उपदेश राष्ट्रभक्ती तसेच समाजभक्तीसाठी महत्त्वाचा आहे.
तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा - छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर झालेल्या सभा मंडपातून यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखी मार्गावर 11 हजार करोडपेक्षा जास्त खर्च - काही महिन्यापूर्वी मला पालखी मार्गातील दोन राष्ट्रीय राजमार्गांच्या चौपदरी करण्याच्या कामाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली होती. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग निर्माण हे 5 टप्पात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्ग निर्माण हे 3 टप्प्यात पूर्ण होणार आहे. या सर्व टप्प्यात 350 किलो मिटर पेक्षा जास्त हायवे हे बनणार आहे. यावर 11 हजार करोड पेक्षा अधिक खर्च होणार आहे अशी घोषणा देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन - भगवान श्री विठ्ठल आणि सर्व वारकऱ्यांच्या चरणावर माझे कोटी कोटी वंदन. आपल्या शास्त्रांमध्ये सांगण्यात आलं आहे, मनुष्य जन्मात सर्वात दुर्लभ संतांचा सत्संग आहे. संतांची कृपा झाली, तर ईश्वराची अनुभती आपोआप होते. आज देहूच्या या पवित्र, तीर्थभूमीवर मला येण्याचे भाग्य लाभले आणि मी देखील इथे तिच अनुभती घेत आहे. देहू संतशिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आहे, कर्मस्थळ देखील आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. तेथे नांदे देव पांडुरंग, धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे. उच्चारीती वाचे नामघोष, देहूमध्ये पांडुरंगाचा नित्यनिवास देखील आहे. इथला प्रत्येकजण स्वत: देखील भक्तीने ओतप्रोत असा संतस्वरुपच आहे. या भावानेने मी देहूतील सर्व नागरिकांना माझ्या माता-भगिनींना आदरपूर्वक नमन करतो. असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सावरकरांना शिक्षा झाली तेव्हा ते तुरुंगात सारखे हातकडी वाजवत - देहूचे शिळा मंदिर हे केवळ भक्तीचे केंद्रच नाही तर भारताच्या सांस्कृतिक भविष्याचा मार्गही प्रशस्त करते. या पवित्र स्थानाची पुनर्बांधणी केल्याबद्दल मी मंदिर ट्रस्ट आणि सर्व भक्तांचे आभार मानतो. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रनायकाच्या जीवनात तुकारामांसारख्या संतांचा फार मोलाचा वाटा आहे. वीर सावरकरांना स्वातंत्र्यलढ्यात शिक्षा झाली तेव्हा तुरुंगात ते तुकारामजींचे अभंग म्हणत, चिपळी सारखे हातकडी वाजवत असं देखील यावेळी पंतप्रधान म्हणाले.
संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देतात - संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत आहेत, मार्ग दाखवत आहेत. असे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी - भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे. जगातील सर्वात जुन्या जिवंत संस्कृतींपैकी भारत एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे. याचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भारताच्या संत परंपरेला, भारतातील ऋषीमुनींना आहे. भारत शाश्वत आहे, कारण भारत ही संतांची भूमी आहे. प्रत्येक युगात आपल्या देशाला आणि समाजाला दिशा देण्यासाठी कुठला ना कोणता तरी महान आत्मा अवतरत आला आहे. आज देशभर संत कबीरदासांची जयंती साजरी होत आहे.अस देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.